Monday, March 2, 2009

सखे...


डोळ्यात पाहता पाहता अवचित मैत्र फुलावा
शब्दात गुंफता शब्द नात्याचा मेळ जुळावा
हलक्याशा विनोदा माझ्या खळखळून दाद तू द्यावी
अन शायरीत तुझ्या ग माझी संध्या न्हाऊनी जावी

मैत्री अशी दृढ व्हावी की शब्दास बंध नसावे
जे मनात तुझ्या ग आले माझ्याही मनी ते यावे
अथांग सागरी किनारा अन सुर्य पलीकडे बुडावा
एकही शब्द न बोलता तिथे संवाद आपला घडावा

चिंब पावसात भिजावे रखरखीत उन्हात फिरावे
साथीला तू असता बस्स निश्चिंत होऊनी जगावे
माळोरान तुजसवे तुडविता काट्यांची फुले व्हावी
चालता चालता तुजसवे ग धरणी अपूरी पडावी

हसावे तुझ्यासोबत अन कुशीत तुझ्याच रडावे
असता तुजसवे मज दु:ख़ ही सुखासम व्हावे
सुख़ दुख़े माझी सारी तुझ्याच आधीन असावी
अंकावरी निजता तुझ्या हलकेच पापणी मिटावी
अंकावरी निजता तुझ्या हलकेच पापणी मिटावी

Sunday, April 20, 2008

एक प्रणय गीत


बाहूत गुंतले बाहू अन श्वासात गुंतले गरम श्वास,
उंच झूल्यावर नेलेस सख्या कि होतसे मजला भास

ही रात्र बेधुंद सख्या अन मी अशी तुझ्या मिठीत रे
श्वास तुज़े गरम की गातोस तू प्रणयाचे गीत रे
आवेगाने चुंबता मजला सोडीशी हे वस्त्रांचे पाश
उंच झूल्यावर नेलेस सख्या कि होतसे मजला भास

केसात गुंतला हात तुझा अन वक्षात गुंतले ओठ
स्पर्शासवे तुझ्या उठती, अंतरी प्रेम तरंगाचे लोट
प्रेम कुबेर तू सख्या ओतीशी मजवर चुंबनाची ही रास
उंच झूल्यावर नेलेस सख्या कि होतसे मजला भास

नको नको की पुरे आता रे पुरे हा धसमुसळेपणा
चुंबीले तू अंग प्रत्यंग बस्स बस्स हा चावटपणा
कर जे हवे हवे तुला ते, संपू दे मिलनाची ही आस
उंच झूल्यावर नेलेस सख्या कि होतसे मजला भास


उन्हाळा उन्हाळा...




पसरले माळरान रखरख ही उन्हाची
दूर दूर चहू दिशांना तहान पावसाची
रुक्ष रुक्ष वृक्षाना लागे आस पालवीची
उन्हाळा उन्हाळा वार्‍यात झूंड झळींची

हताश होऊन मुकेपणाने बसली सारी घरे
गोठ्यात कुणाच्या तहानलेले वासरू ते हंबरे
तप्त वारे तप्त घरे तप्त आसमंत सारे
उन्हाळा उन्हाळा पाण्यासाठी आसक्त सारे

तुझ्या विना आहे सारे आयुष्यच हे उन्हाळा
थंडगार घरी पेटल्या एकलेपणाच्या ज्वाळा
सुन्न खोल्या सुन्न मने सुन्न सुन्न झोपाळा
उन्हाळा उन्हाळा परी भूलते मन मृगजळा


पाऊस वळीवाचा... पाऊस मिलनाचा...


त्या वृक्षातळी बाकावरती रेंगाळती अजुनी ते दिन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

वृक्ष हिरवा विशाल परी झडे पाचोळा बाकावरती
थंड थंड वार्‍यासवे स्वच्छंद मनाने पक्षी फिरती
मधून कोवळा मधून पिवळा पाचोळा असा रंगीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

गाल गोबरे छान लाजरे वाट पाहती भाऊक डोळे
पाय गुलाबी बाकावरती हाती मज ते हात कोवळे
पान वाजले बावरी करी धडपड मिठी सोडण्या क्षीण
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

पदर ढळे नकळे मेघ गर्जती थेंबांचे हलके शिडकावे
नव्या जवानीत नवी उभारी मृदगंधाने भान हरावे
अधर थरथरे पदर भुरभुरे तव ओठ विलग आणखीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

सामावली मिठीत कातरवेळी कुठे, कोसळली जणू वीज
आवेग ढगांचा धरतीशी मिलनाचा प्रेम काय आहे ही चीज
मातीशी नाते जुळता जुळता झाले आभाळ कसे तल्लीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

अशीच रात्र सरेल ही...



एक रीकामी रीकामी ऊशी अन चांदण्या निरभ्र आकाशी
अशीच रात्र सरेल ही, कवटाळून आठवणी उराशी

तू सूरात गाणे गावे मज जगण्याचे सूर मिळावे
तू चित्रात रंगूनी जावे मज जगण्याचे रंग मिळावे
विरहाने तडफडवून मजला, खेळी चंद्र आयुष्याशी
अशीच रात्र सरेल ही, कवटाळून आठवणी उराशी

असण्याने तुझ्या विसरीतसे अस्तित्त्व मी माझे
हसण्याने मधाळ वाटे जणू होती रीते घट मधाचे
चांदणे नच हे परी शिंपडे कुणी कुपी विषाची
अशीच रात्र सरेल ही, कवटाळून आठवणी उराशी

भरभरून जगलो ग जगणेच माझे झाले तुजमय
गूंतूनी गेलो तुजरूपी जसा परवाणा होई दीपमय
म्रृत्यू काय तो झाला मज माहीत खातात कशाशी
अशीच रात्र सरेल ही, कवटाळून मरण उराशी

Saturday, April 19, 2008

सहवासात तुझीया सखे...

वर्षावात चांदण्यांच्या मी बेधुंद होऊनी न्हालो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

ह्या वेली हे अंगण अन आभाळ पसरले वरती
वरूणाच्या स्वागता कशी नटून बसली धरती
निसर्गाचे लोभस रूपडे पाहूनी मी शहारलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

रेशमाची लडी की हा हात आहे तुझा माझ्या हाती
आभाळ दाटले की घनगर्द केस पसरले खांद्यावरती
डोळ्यात तुझ्या पाहता जणू जीवनामृत मी प्यायलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

विसावलो तुझ्या अंकावरी हात तुझा फिरे गालावरती
अन गोड तुज़े हासने जेंव्हा असे सदैव डोळ्यापुढती
मोक्ष मोक्ष ज्यासी म्हणती अर्थ मी त्याचा उमगलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

प्रणयरंग होळीचे


रंगात तुझ्या रंगून राजसा ओली मी झाले अशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी

हातात तुझ्या ती पिचकारी, अन डोळ्यात आगळे भाव
विरोधा माझ्या न जुमानता, तू अचूक साधीशी डाव
साडी ओली केस ही ओले, ओले अंग प्रत्यंग करीशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी

चकवून गेले तुला साजना, अन परसदारी मी पळाले
पाठी येता शोधीत मजला, आपसूक एकांती तुला मिळाले
पिचकारी मग भिरकाऊनी, जवळ ओढूनी मजला घेशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी

अंग ओले परी श्वास गरम, अन बाहूत तुझ्या मी आले
रंगात तुझ्या रंगता सख्या रे, बेभान होऊनी मी गेले
नको नको ना पुरे आता रे, किती तू धसमूसळा होशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी

वस्त्रे गळता राहीले रंग बस, अन अंगास अंगे मिळाली
सरून जाता आवेग सख़्या रे, भासे मोक्ष-मुक्ती मिळाली
आत्मा अंग अन मोहमाया रंग, सख्या रे ईश्वर तू असशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी