Sunday, April 20, 2008

पाऊस वळीवाचा... पाऊस मिलनाचा...

त्या वृक्षातळी बाकावरती रेंगाळती अजुनी ते दिन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

वृक्ष हिरवा विशाल परी झडे पाचोळा बाकावरती
थंड थंड वार्‍यासवे स्वच्छंद मनाने पक्षी फिरती
मधून कोवळा मधून पिवळा पाचोळा असा रंगीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

गाल गोबरे छान लाजरे वाट पाहती भाऊक डोळे
पाय गुलाबी बाकावरती हाती मज ते हात कोवळे
पान वाजले बावरी करी धडपड मिठी सोडण्या क्षीण
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

पदर ढळे नकळे मेघ गर्जती थेंबांचे हलके शिडकावे
नव्या जवानीत नवी उभारी मृदगंधाने भान हरावे
अधर थरथरे पदर भुरभुरे तव ओठ विलग आणखीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

सामावली मिठीत कातरवेळी कुठे, कोसळली जणू वीज
आवेग ढगांचा धरतीशी मिलनाचा प्रेम काय आहे ही चीज
मातीशी नाते जुळता जुळता झाले आभाळ कसे तल्लीन
भग्न मनाने पुन्हा मी जाई तिथे आता होऊनी दीन

No comments: