Saturday, April 19, 2008

सहवासात तुझीया सखे...

वर्षावात चांदण्यांच्या मी बेधुंद होऊनी न्हालो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

ह्या वेली हे अंगण अन आभाळ पसरले वरती
वरूणाच्या स्वागता कशी नटून बसली धरती
निसर्गाचे लोभस रूपडे पाहूनी मी शहारलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

रेशमाची लडी की हा हात आहे तुझा माझ्या हाती
आभाळ दाटले की घनगर्द केस पसरले खांद्यावरती
डोळ्यात तुझ्या पाहता जणू जीवनामृत मी प्यायलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

विसावलो तुझ्या अंकावरी हात तुझा फिरे गालावरती
अन गोड तुज़े हासने जेंव्हा असे सदैव डोळ्यापुढती
मोक्ष मोक्ष ज्यासी म्हणती अर्थ मी त्याचा उमगलो
सहवासात तुझीया सखे मी दुनिया सारी विसरलो

No comments: