रात्रीचे दहा वाजलेत...
ब्राझीलहून निघून झाले असतील तीनेक तास
बाहेर आजूबाजूला चिर्रर्रर्र अंधार..
रक्ताचा बर्फ होईल इतके थंड तापमान
समोर काळाकभिन्न अक्राळविक्राळ वादळी ढग़
आणि त्यात चाललेला राक्षसी वीजांचा नंगा नाच
आणि खाली.. पस्तीस हजार.. पस्तीस हज्जार फूटांवर
अथांऽऽग अथांऽऽग अटलांटीक
वादळाची महाकाय जीभ विमानाकडे करून पडलेला
पायलट कडून सूचना..
कमर पट्टे बांधा.. वादळात चाललो आहोत
माझ्या बाजूला एक माता तान्हूलीला घेऊन बसलेली
विमानाच्या हादर्यांनी तान्हूली गम्मत वाटून हसणारी
ती मातेच्या कुशीत आणि माता तंत्रज्ञानाच्या...
मानवी तंत्रज्ञान निसर्गावर मात करेल
असा फाजील आत्मविश्वास.. तिलाही, मलाही
अजून एक जोराचा धक्का, विमानात बरीच उलथापालथ
सगळे खडबडून जागे... काही अस्फूट किंकाळ्या
पायलटकडून, धीर देणारा एक फूटकळ संदेश
विमानाचे धक्के तीव्रतेने वाढताहेत
आणि लगेचच.. अजून एक जबरदस्त धक्का
पाठोपाठ कानठळ्या बसवणारा आवाज
क्षणात खूर्ची पूर्ण आडवी, तिला टांगल्या अवस्थेत मी
विमानातले दिवे गेले, सगळीकडे गुडूप अंधार
किंकाळ्या आणि आरडा ओरडा, चित्र विचित्र कर्कश्श आवाज
मम्माऽऽऽ.. एक कोवळी भेदरलेली हाक, दूरवर विरून गेली
आणि पाठोपाठ रक्त गोठवणारा, तिच्या मम्मीचा गगनभेदी हंबरडा
सार्या विमानात कर्कश्श आवाज, अंधार आणि प्रचंड कोलाहाल
श्वास घेणं अवघड होतंय...
जीव गुदमरून चाललाय, अचानक कडाक्याची थंडी
आणि अतिप्रचंड वेगाने खाली जात असल्याची जाणीव
बापरे! हे काय.. खिडकीतून बाहेर आगीच्या लवलवणार्या जिभा..
आणि लगेचच एक महाप्रचंड स्फोट.. एक महाप्रचंड स्फोट !
खुर्चीसह बाहेर फेकले गेलोय..
हातपाय बधीर सर्वाँग बधीर, श्वास पुर्ण कोंडलाय
जीवाची प्रचंड घुसमट, शरीराची प्राणांतिक तडफड
आता बस्स काही क्षणच...
मग सूटेन तडफडीतून कायमचा..
ह्या नव्हे.. कारण ही तडफड काहीच नाही, खरंच काही नाही
जेंव्हा तू सोडून गेली होतीस.. तेंव्हा ह्यापेक्षा जास्त तडफडलो होतो
आताची अवस्था त्यामानाने खूप बरी आहे.. खूपच बरी
आता बस्स काही क्षणच, आणि..
सुटेन कायमचा तुझ्या विरहातून
सुटेन... का... कायमचा... तु.. तु...झ्या विरहातून
सु... टे... न.... !!!
-अतुल (७ जून २००९)
Thursday, June 25, 2009
AIR FRANCE Flight 447
Posted by Atul at 11:50 AM
विभाग: कविता माझी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
vaa........apratim kalpana ahe....
कारण ही तडफड काहीच नाही, खरंच काही नाही
जेंव्हा तू सोडून गेली होतीस.. तेंव्हा ह्यापेक्षा जास्त तडफडलो होतो
आताची अवस्था त्यामानाने खूप बरी आहे.. खूपच बरी
आता बस्स काही क्षणच, आणि..
सुटेन कायमचा तुझ्या विरहातून
भलताच चटका बसला !
Post a Comment