Thursday, April 16, 2009

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी...

आयुष्यातल्या एका वेड्या क्षणी, कोणीतरी आपल्याला आवडतं. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. कालांतराने हीच भावना बळावते आणि 'त्याच्या' किंवा 'तिच्या' शिवाय जगणे फार अवघड आहे इत्यादी इत्यादी विचार मनात येतात. हे सगळे फार नैसर्गिक आहे. खरंतर हा त्या वयाचा प्रताप असतो. खरंतर त्या वयात 'कुणीतरी' आवडावं इतकीच योजना निसर्गाने केलेली असते. पण 'त्याच्याशिवाय शक्य नाही' हा मात्र पूर्ण मनाचा खेळ असतो. आयुष्यात प्रथमच असे घडत असल्याने मनाची तशी समजूत होणे स्वाभाविक आहे. त्या वयात निसर्ग स्वप्न पहायची वृत्ती देतो, व्यवहार नव्हे. प्रेम करायची भावना देतो, विषयाकर्षण नव्हे. 'तूच एकमेव' चा विचार देतो, 'तू पण चालेल' नव्हे. थोडक्यात काय, तर मन स्वप्नाळू आणि अपरीपक्व असते.

पण हा काळ दुर्दैवाने जास्त नसतो. मनाची ही अवस्था आयूष्यभर राहू शकत नाही. ते जेंव्हा स्वप्नातून सत्यात येते, तेंव्हा 'स्वप्नात असताना' घेतलेले निर्णय जर त्याला चुकिचे वाटले तर मग सुरू होते ती मनाची असह्य फरफट. आणि प्रेम-विवाह करून नंतर घटस्फोट घेणार्‍या बहुतांश जोडप्यांमध्ये ही फरफटच कारणीभूत असते!

मग सत्य काय आहे? अशा मनाला काबूमध्ये आणावे तरी कसे? योग्य जोडीदार खरोखर 'एकमेव' असतो का? 'त्या वयात' मनाची समजूत कशी घालावी? असे अनेक विचार मनात येतात. आणि इथेच मन परीपक्व व्हायला चालू होते असे म्हणायला हरकत नाही.

व्यवहारी विचार केला, तर 'तो किंवा तीच एकमेव' ही कल्पना चुकीची आहे. एक नाही मिळाला तरी आपल्याला हवा तसा दुसरा जोडीदार मिळणे हे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. शेवटी 'लग्नांतरचे यशस्वी आणि सुखी आयुष्य' हेच आपल्याला हवे असते ना? मग काय लागते त्यासाठी? तर त्यासाठी तीन 'स' पहावे लागतात. 'सवय, स्वभाव आणि समजूतदारपणा'.

सवयी काय आहेत? आपल्याला जूळणार्‍या आहेत का? (एकाला क्रिकेट आवडते तर दुसर्‍याला 'एकता कपूर' ची सिरियल! बस्स इतके कारण खूप असते. हो ना? :) स्वभाव कसा आहे. आपल्याशी जुळतो का? आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट 'समजूतदारपणा'. ही एकच गोष्ट पहील्या दोन्हींना पुरून ऊरेल. म्हणजे, जरी स्वभाव आणि सवयी जुळत नसतील तरी केवळ 'समजूतदारपणा'च्या जोरावर संसार खूप सुखी होतो.

तेंव्हा, तारुण्याच्या भरात पट्कन आवडून गेलेली एखादी व्यक्ती 'आयुष्याचा जोडीदार' करण्याची गडबड मुळीच करायला नको. ह्या तिन्ही गोष्टी पुरेसा वेळ देउन पहायला हव्यात.. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ह्या तिन्ही गोष्टि जुळणारी एखादी व्यक्ती जरी आपली झाली नाही, तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही. आपल्यासाठी दुसरे कोणी तरी जरूर वाट पहात असते :)

4 comments:

Anonymous said...

अगदी सत्य लिहिलं आहे तुम्ही. बायको निवडताना नेमकं काय पहावं हे कळत नाही आजच्या पिढीला.

me said...

very true!

प्रतिमा राठी said...

हा "समजूतदारपणा" आवडला !!

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

Mr. Atul, Perfect Said