Friday, April 10, 2009

ध्वनीवर्धक, फटाके आणि आपण...

परवाच्या सोमवारी एका महादेव मंदिरात गेलो होतो. मोठ्मोठ्याने कानठळ्या बसतील अशा आवाजात ध्वनिवर्धक लावले होते. ते मी बंद करायला लावले आणि मंदिरातील प्रसन्न शांततेचा अनुभव घेतला. देवाचे सानिध्य खरोखरीच अनुभवायचे असेल तर चित्त शांत हवे.

मुख्यत्वे गणेशोत्सवात, दिवाळीत आणि खाजगी समारंभांमध्ये ह्या आवाजाचा कहर होतो.

वातावरणात प्रचंड कोलाहल असेल तर चित्त शांत कसे राहील. मग अशा वातावरणात परमेश्वराची अनुभूती येईल काय? आणि जर परमेश्वराची अनुभूती येत नसेल किंवा आपण त्याची फिकिर करत नसू, तर गणेशोत्सवात गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यामागचे प्रयोजन तरी काय? असे केल्याने त्या मंगलमुर्तीची आपण कुचेष्टा करत आहोत असे वाटत नाही का?

मंगलमुर्तीच्या सान्निध्यात मंद तेवणारी समई असते, आणि सुवासाने वातावरण प्रसन्न होईल इतकाच धूर येणारी धूपबत्ती असते. तिथे आपण समईच्या जागी ढणाढणा पेटलेले कोलीत लावत नाही अथवा धूपबत्तीच्या जागी बकाबका धूर ओकणारे धुराडेही लावत नाही. मग आवाजाच्याच बाबतीत आपण असे का करतो? मनाला प्रसन्नता वाटेल असेच आणि इतकेच संगीत आपण का नाही लावत?

तीच गोष्ट दिवाळी आणि खाजगी समारंभांची. फटाकांच्या कर्णकर्कश्श आवाजाने इतरांच्या कानठळ्या बसवून 'आसूरी' आनंद घेण्याची आपली वृत्ती काय दर्शविते? नरकासूराचा वध केल्याबद्दल सारा परीसर दिवे आणि प्रकाशाने उजळून टाकण्याचा हा दिपोत्सव आहे. पण ह्याच काळात आपल्यातला एक 'आसूर' जागा होऊन दिवसा, रात्री/अपरात्री फटाके वाजवत इतरांना त्रास देत असतो. ह्या विरोधाभासाला काय म्हणावे? खाजगी समारंभांमध्येसुद्धा त्या मांडवापुरता तिथल्या लोकांनाच प्रसन्न वाटेल इतकाच ध्वनीवर्धकाचा आवाज न ठेवता सारे गल्लीबोळ आणि परीसर हादरून सोडल्याने काय साध्य होते?

ह्या कर्कश्श आवाजामूळे आजुबाजूच्या रहिवाशाना नागरीकाना त्रास होतो तो वेगळाच. त्याचा विचार कोणी करते का? कोणाला रक्तदाबाचा विकार असतो तर कोणाला डोकेदुखीचा, कोणाची कसली परीक्षा असते तर कोणाची नोकरीसाठी मुलाखत, कोणाला निद्रानाशाचा त्रास असतो तर कोणी कसल्या विवंचनेने त्रस्त असतात, कोणाच्या घरी लहान बाळे असतात तर कोणाच्या घरी अति वयस्क व्यक्ती. ह्या सर्वाना ध्वनीप्रदूषनाचा त्रासच होत असणार. ते लोक ध्वनिवर्धक लावणार्‍यांना, फटाके वाजविणार्‍यांना शिव्याशाप देत नसतील काय? मग सण समारंभ साजरे करणारे काय मिळवितात?

ध्वनीप्रदूषनाने काय होऊ शकते? ही clip जरूर पहा.

प्रत्येकाने विचार करावा

No comments: